Maharashtra Rain : राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुढील 48 तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तर विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्नरमध्ये पावसाचा जोर वाढला
जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात पाऊसाची जोरदार बँटिंग सुरु आहे. रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरुप आलंय. अशातच जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावालगत ओढ्यातुन असणाऱ्या रस्त्यावरुन जाणारा एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. वाहून गेलेल्या व्यक्तीचा स्थानिक नागरिकांकडून शोध सुरु आहे. 


चंद्रपूरमध्ये पोलिसांची धाडसी कामगिरी
चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवीत धाडसाची कामगिरी केली. चिंचोली नाला इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मध्यपदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस  पुढे दामटली. 


सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव अभियान सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून वृद्ध- लहान मुले, महिलांना बाहेर काढलं.


पुण्यात अग्निशमन दलाने केली एकाची सुटका
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीची अग्निशमन दलाने सुटका केली आहे. पुण्यामध्ये नांदेड सिटी आणि शिवणे ला जोडणारा पूल आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने या पुलावर पाणी आलंय. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असं असताना एक व्यक्ती त्या पुलावर अडकून पडल्याचं निदर्शनास आलं. खांबाचा आधार घेऊन थांबलेल्या त्या व्यक्तीला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं.