अपघातानंतर... निहारच्या डोळ्यांनी `दोघीं`नी जग पाहिलं...
निहार गेला... पण, चिमुरड्यांच्या अंधःकारमय आयुष्यात `उजेड` पसरवून
मुंबई : अभिनयाचे प्रचंड वेड... नसानसात 'हिरो'ईझम... शॉर्टफिल्म प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असे असताना निहार गोळे या २१ तरुणाचे दोन दिवसांपूर्वी भांडुप येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या निहारच्या जाण्यानं गोळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला सारून त्यांनी त्याचे दोन्ही डोळे दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आज निहारच्या त्या डोळ्यांनी दोन लहानग्या मुलींना दृष्टीही मिळाली. एकीकडे तरण्याबांड मुलाच्या निधनाचे दुःख तर दुसरीकडे त्यांचे डोळे आपल्याला पाहत आहेत याचा आनंद... अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या गोळे कुटुंबियांच्या धैर्याला निश्चितच सलाम करायला हवा.
ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत निहार प्रमोद गोळे हा तरुण राहत होता. येथील जोशी बेडेकर कॉलेजात मास मीडियाचे शिक्षण नुकतेच पूर्ण केलेल्या निहारला अभिनयाचे प्रचंड वेड होते. काही दिवसात तो कॅनडाला सचिन पिळगावकर यांच्याबरोबर एका मराठी सिनेमात काम करणार होता... तर आणखी एक मराठी सिनेमाही निहारच्या हाती होता. त्या दिशेने त्याचा प्रवासही सुरू होता.
निहारचे वडील एअर इंडियातून निवृत्त झाले होते... तर, आई ठाणे महापालिकेत कार्यरत असून दोन महिन्यांनी निवृत्त होणार आहेत.
शनिवारी पहाटे पार्टीहून घरी परतत असताना भांडुप उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर निहार आणि त्याचा मित्र यश चौगुले यांना व्होकार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच निहारचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
त्यानंतर हॉस्पिटलने अवयवदानाबाबत विचारणा केल्यानंतर निहारच्या पालकांनी त्याचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. अखेर आज सकाळी या रुग्णालयातच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर निहारचे डोळे ११ व सात वर्षीय मुलींना देण्यात आले.
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दोघींचेही आयुष्य उजाळून निघालंय. निहारच्या जाण्याने या चिमुरड्यांच्या अंधःकारमय आयुष्यात 'उजेड' पसरला आहे.