`स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला`?, निलेश राणेंचा संजय राठोडांना सवाल?
महाविकासआघाडी सरकारवर देखील केली टीका
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर (Pooja Chavan Suicide Case) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका होत आहे. असं असताना मंगळवारी पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेलेले संजय राठोड तब्बल १५ दिवसांनी सगळ्यांसमोर आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केलं. (Nilesh Rane on Sanjay Rathod) यावेळी संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले.
संजय राठोड यांच्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. निलेश राणे यांनी या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 'जर स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला'?, असा सवाल निलेश राणे यांनी संजय राठोडांना विचारला आहे. संजय राठो़ड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. तसेच राठोडांनी चौकशीला सामोरं जा असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
या आधी जितेंद्र आव्हाडांची इंजिनिअरला मारहाण केली होती. तसेच धनंजय मुंडे यांचं करूणा शर्मा प्रकरण देखील दाबलं गेलं. यावरून राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे स्पष्ट होत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच राजरोसपणे महिलांवर अत्याचार करायला लागले तर काय होणार?, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.
संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्ती प्रदर्शनाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यांचं पद धोक्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी याप्रकरणी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं चित्र तयार झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोहरादेवी इथल्या गर्दीप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे.