अतिशहाणपणा शिकऊ नका, गुन्हेगारांना पाठीशी घालू नका - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला
मुंबई : MLA Nitesh Rane News : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. तर कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली.
अतिशहाणपणा शिकऊ नये
यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र सरकार हे कायद्याप्रमाणे काम करत आहे, कोणीही अतिशहाणपणा शिकऊ नये असं संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
पोलीस त्यांना हवा असलेला आरोपी शोधत आहेत, केद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत सांगतायत मला माहित नाही, पोलिसांना त्यांनी सहकार्य करावं, मित्र असो वा पूत्र माहिती द्यावी अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धोरण हे चुकीचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
दरोडेखोरांना पकडायला या सरकारला वेळ नाही पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस द्यायला त्यांना वेळ आहे अशा प्रकारचे जे काम चाललं आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही भक्कमपणे नारायण राणे यांच्या पाठीशी आहोत असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.