अश्विन पांडेय, झी मीडिया, मुंबई  : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी (Nitin Desai Suicide) झी 24 तासची मोहीम सुरूच राहणार आहे. देसाईंसोबत जे झालं, ते कुणासोबतही होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. एडलवाईज फायनान्स कंपनीवर (Edelweiss Group) देसाई कुटुंबीयांनी अनेक आरोप केलेत. झी 24 तासनं त्याची बातमी दाखवल्यानंतर एडलवाईजनं कायदेशीर नोटीस पाठवलीय. देसाई प्रकरणात कुटुंबीय आणि फायनान्स कंपनी अशी दोघांचीही बाजू आम्ही मांडलीय. नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीनंतर एडलवाईजनं झी न्यूजला कायदेशीर नोटीस पाठवलीय... या नोटीशीच्या (Notice) माध्यमातून एडलवाईज फायनान्स कंपनीनं आपली भूमिका स्पष्ट केलीय... त्यानुसार,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- 2016 मध्ये नितीन देसाई आणि त्यांची पत्नी नयना देसाई यांच्या एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं एडलवाईज ग्रुपची कंपनी ECL फायनान्सकडून 150 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं
- फेब्रुवारी 2018 मध्ये ECL फायनान्सकडून आणखी 31 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं
- सप्टेंबर 2018 पासून कर्जाचं व्याज फेडण्यात विलंब होऊ लागला
- मे 2019 मध्ये कर्जफेडीमध्ये सुलभता यावी, यासाठी तारण म्हणून ठेवलेली एक व्यावसायिक मालमत्ता विकण्यास एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडला ECL फायनान्सनं परवानगी दिली
- ही मालमत्ता विकून एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडनं व्याजाची थकबाकीची रक्कम चुकती केली आणि डिसेंबर 2019 मध्ये 12.5 कोटी रुपये इतकी मुद्दलाची रक्कम ECL फायनान्सला परत केली
- डिसेंबर 2019 नंतर एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडनं व्याज आणि मुद्दलाच्या रकमेपैकी एक रुपयाही परत केलेला नाही
- डिसेंबर 2020 मध्ये ECL फायनान्सनं सर्वसाधारण व्यावसायिक प्रक्रियेनुसार हे कर्ज खाते CFM ARCकडे वर्ग केलं
- CFM ARC ने कर्जवसुलीसाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचं कर्ज खातं वसुली होऊ न शकल्यानं NPA म्हणून घोषित करण्यात आलं
- डिसेंबर 2022 मध्ये ECL फायनान्सनं एका लिलावात CFM ARC च्या 6 कर्ज मालमत्तांचा फोर्टफोलिओ खरेदी केला, त्यापैकी एक कर्ज खातं एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचं होतं
- 25 जुलै 2023 दरम्यान NCLT ने एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणी CFM ARC ची याचिका दाखल करून घेतली, जी आता ECL फायनान्सकडे असाईन झालेली होती
- NCLT ने एका अंतरिम रिझॉल्यूशन व्यावसायिकाची नियुक्ती केली, कायद्यानुसार प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत कंपनीचं व्यवस्थापन अंतरिम रिझॉल्यूशन व्यावसायिकाच्या हाती असतं
- NCLT च्या आदेशाविरुद्ध एनडी आर्टस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडनं दाखल केलेली याचिका अपीलीय प्राधिकरणानं 1 ऑगस्ट रोजी फेटाळली
- 2 ऑगस्ट 2023 रोजी नितीन देसाई यांनी आत्महत्या केली
- 4 ऑगस्ट 2023 रोजी नयना देसाई (ज्या या प्रकरणात सह गॅरेंटर आहेत) यांनी त्रास दिल्याचा आरोप करत एडलवाईज ग्रुपच्या वरिष्ठ अधिका-यांविरुद्ध FIR दाखल केली
- एडलवाईजनं नयना देसाईंचा आरोप खोटा असल्याचा दावा केला. 
- या FIR ला एडलवाईजच्या अधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय


एडलवाईज ग्रुपचं म्हणणं आहे की, कंपनीनं किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. अन्य कर्जदात्यांप्रमाणं त्यांच्याकडेही कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि अशा कायदेशीर पर्यायांचा वापर करणं हा छळ, चूक किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं मानता येणार नाही


खरं तर नितीन देसाईंच्या कुटुंबानं या प्रकरणात एडलवाईज फायनान्स कंपनी आणि अधिकाऱ्यांवर आरोप केलेत. एडलवाईजमुळंच देसाईंनी 2 ऑगस्टला आत्महत्या केली आणि आता ही कंपनी एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याचा खटाटोप करतेय, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंची बातमी इतर टीव्ही न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रं विसरून गेलेत मात्र देसाई कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत झी 24 तासची ही मोहीम सुरूच राहणार आहे.