अतिकष्टामुळे प्रकृतीवर परिणाम होतोय, काळजी घ्या; पवारांचा गडकरींना सल्ला
राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली.
मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी अहमदनगरमधील एका कार्यक्रमात चक्कर आल्यानंतर पक्षीय भेद बाजूला ठेवत अनेक राजकीय नेते त्यांच्या प्रकृतीच्या विचारपूस करण्यासाठी पुढे सरसावताना दिसले. अनेकांनी फोन करून गडकरी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गडकरींना प्रकृती जपण्याच सल्ला दिला. शरद पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कधीकधी अतिमेहनतीमुळे आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रकृतीला जपा. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच माझी प्रार्थना असल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नितीन गडकरी आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने शिर्डीत आले. तेथून ते राहुरीतील कार्यक्रमात गेले. तिथे जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले. यानंतर कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. सुदैवाने यावेळी राज्यपाल विद्यासागर राव गडकरींच्या बाजूला उभे होते. गडकरींना चक्कर येत असल्याचे बघून विद्यासागर राव यांनी लगेचच त्यांना सावरले. यानंतर गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ते स्वतःच चालत गेले आणि वाहनात बसले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.