धक्कादायक ! अनाथ मुलांना `आधारकार्ड`चा आधार नाही
अनाथ आश्रमात जी मुलं वाढून मोठी झाली यांच्याकडे वास्तव्याचा पुरावा नसल्यानं या मुलांना आधार कार्ड देण्यात येत नाही.
मुंबई : अनाथ आश्रमात जी मुलं वाढून मोठी झाली यांच्याकडे वास्तव्याचा पुरावा नसल्यानं या मुलांना आधार कार्ड देण्यात येत नाही. त्यामुळे या तरुणांना आपल्या बँकेमध्ये आधारकार्ड देणे शक्य नाही. आता यामुळे या मुलांची बँक खाती बंद होणार आहेत. याबाबत शासनाने तात्काळ काही तरी उपाय करावा अशी मागणी निराधार संस्थेने केली आहे .
आधीच आई - वडिलांचं छत्र नाही त्यात घर कुठून येणार? वयाची १८ वर्ष होईपर्यंत अनाथ आश्रमात आश्रय घ्यायचा आणि त्यानंतर मात्र बाहेरच्या जगात जगण्याची धडपड असते. यातही शासनाच्या योजना मिळण्यासाठी या मुलांना खूप त्रास होतो. वास्तव्याचा पुरावा देऊ शकत नसल्याने रेशन कार्ड नाही, आता तर सरकारनं आधारकार्ड बँकेला सक्तीने जोडायला सांगितल्यानं या निराधार तरुणांची बँक खाती बंद पडण्याची वेळ आलीय.
साधं घर भांड्यावर घ्यायचं असेल, मोबाईल चं सीम घ्यायचं असेल तरी आता मात्र आधार कार्डची गरज भासते. अनाथ आश्रमातून बाहेर पडलेली मुलं ही नोकऱ्या करतात. काही मूल उच्चशिक्षित आहेत. पण त्याच्याकडे आधारकार्ड काढण्यास काही पुरावा नसल्याने यांची बँक खाती बंद होण्याची भीती आहेत. आणि म्हणूनच या निराधार असलेल्या मुलामुलींसाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी देशातून होत आहे.