मुंबई : राज्यात कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी ६ जण परदेशात प्रवास करून आलेले आहेत, तर ८ जणांना कोरोनाबाधितांचा जवळून संबंध आल्यानं कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवानं अजून कोरोनाचा समाजात फैलाव (कम्युनिटी स्प्रेड) झालेला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जनतेनं जमावबंदी आदेश तंतोतंत पाळावा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.


बॉर्डर सील करणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोका टाळण्यासाठी सीमा सील करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. गोव्याची सीमा सील केली आहे. अन्य ठिकाणाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.


घरी थांबा, घरातही सुरक्षित अंतर ठेवा


सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती आरोग्यमंत्र्यांनी आज पत्रकारांनी दिली. यापुढे जनतेनं आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सोशल डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. घरातच थांबा आणि घरातच सुरक्षित अंतर ठेवा, अशी सूचनाही आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांना मधुमेह, अतिउच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांची विशेष काळजी घ्यायला हवी, असं टोपे यांनी सांगितलं.


मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एक रुग्ण आयसीयुमध्ये आहे. अन्य रुग्ण सामान्य असून त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणंही दिसत नाहीत. रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांची आज १४ दिवसांनंतर टेस्ट करण्यात येणार असून ते निगेटिव्ह आढळल्यास त्यांना घरी पाठवलं जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.


तपासणी सुविधा वाढवणार


आतापर्यंत ६ ठिकाणी कोरोनाबाबतची चाचणी केली जात आहे. २७ मार्चपासून सर्व मेडिकल कॉलेजमध्येही लॅब सुरु होतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टेस्ट करणं शक्य होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. याशिवाय खाजगी लॅबलाही केंद्राकडून परवानगी मिळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.