अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राज्यात सध्या २१०० मेगावॅटचा तुटवडा आहे. सरकारने ७०० मेगावॅट वीज बाहेरून विकत घेतली आहे, तरी देखील २१०० मेगावॅट वीजेचा तुटवडा कायम आहे. 


काही शहरांमधील भारनियमन बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने काही शहरांमधील मुख्य भागातील भारनियमन कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करत असताना, तुर्तास का असेना, ग्रामीण तसेच निमशहरी भागातील भारनियमन कायम राहणार असल्याने, ग्रामीण महाराष्ट्रावर मात्र अन्याय होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात अंधार असणार आहे.


ऑक्टोबर हिटचे चटके वाढत असताना


ऑक्टोबर हिटचे चटके वाढत असताना, भारनियमनात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये एक संताप निश्चितच आहे. मात्र ठाणे, मुंबईचा मुलुंडमधील भाग, नाशिक, पुणे या शहरातील मुख्य भागातील भारनियमन सरकारने मागे घेतले आहे.


ग्रामीण, तसेच निमशहरी भागात लोड शेडिंग कायम


भारनियमन कधी कमी होईल, आणि परिस्थिती कधी पूर्वपदावर येईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, मात्र याविषयीची  अनिश्चितता कायम आहे. दिवाळीच्या तोंडावर सरकारच्या चुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.


ग्रामीण भागात प्रमाणापेक्षा जास्त लोड शेडिंग


सरकार एकीकडे शहरी भागातील नागरिकांवर मेहरबान असलं, तरी ग्रामीण भागाकडे कानाडोळा केल्याचं चित्र मात्र आता स्पष्ट आहे. ग्रामीण भागात तासंनतास वीज जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.