शपथविधी सोहळा : वाहतुकीत बदल, येथे NO PARKING
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी सोहळा
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतीर्थावर सायंकाळी 5 वाजता हा शपथविधीसोहळा संपन्न होणार आहे. यावेळी सहा मंत्री देखील आपली शपथ घेतील. तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कारभार सांभाळणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक नेते मंडळी तसेच मान्यवर मंडळी आणि शिवसैनिक, सामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुरक्षेचा आणि वाहतूकीचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. तब्बल 16 मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
या मार्गांवर गाड्या पार्किंग करण्यास मनाई
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक चौक ते माहीमच्या हरी ओम चौक
राजा बढे चौक ते केळुस्कर मार्ग चौक
ले. दिलीप गुप्ते चौक ते पांडुरंग नाईक मार्गाची दक्षिण वाहिनी
गडकरी चौक ते केळुसकर मार्ग (दोन्ही वाहिन्या)
एल जे मार्गावरील बाळ गोविंदास मार्ग ते पद्माबाई ठक्कर मार्ग चौका
त्यात केळुसकर मार्ग, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, ले. दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग, कीर्ती महाविद्यालयाजवळील रस्ता, काशीनाथ धुरू मार्ग, प्रभादेवी येथील पी. बाळू मार्ग, वरळी कोळीवाडा येथील आदर्श नगर, रफी अहमद किडवई मार्ग, पाच उद्यान, सेनापती बापट मार्ग, रानडे रोड, हिंदुजा रुग्णालयाजवळील कोटनीस मार्ग या रस्त्यांचा समावेश आहे. दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा बदल करण्यात आला आहे.
वाहने 'या' ठिकाणी पार्क करता येणार
शपथविधीला विविध ठिकाणांहून मान्यवर तसेच शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. याकरता पोलिसांनी सार्वजनिक वाहनतळांची व्यवस्था केली आहे. पश्चिम उपनगरातून येणाऱ्या बसेसच्या पार्किंगकरता सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान, लोढा पार्क येथे व्यवस्था केली आहे. तर हलक्या वाहनांसाठी इंडिया बुल्स सेंटर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर आणि वर्ल्ड टॉवर्स येथील सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
पोलीस सुरक्षा व्यवस्था
शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. बंदोबस्तासाठी २ हजार अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधीला राजकीय पक्षांचे पुढारी, पदाधिकारी, शासनाचे अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहाणार आहेत. कोणत्याही अनुचित घटनेने या सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी सुरक्षेसाठीची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह सशस्त्र पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक बंदोबस्तासाठी तैनात असतील. परिसरातील प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटाव्हींसह अन्य तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.