मुंबई : महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार येऊन १३ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. शिवाजी पार्कवर २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा शपथविधी पार पडला. या ६ जणांचे शपथविधी पार पडले असले तरी सध्या हे सगळे जण बिनखात्याचे मंत्री आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाच्या खात्यांवरुन या तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप अडलं आहे. महाविकासआघाडीमध्ये तीन खात्यांवरुन अद्याप निर्णय झालेला नाही. गृह मंत्रालय, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यावरुन या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा अडली आहे. आज संध्याकाळपर्यंत चर्चा संपून खातेवाटप होईल, अशी आशा महाविकासआघाडीच्या नेत्यांना आहे.


राष्ट्रवादीला गृहखातं किंवा नगरविकास खातं हवंय पण शिवसेना ते सोडायला तयार नाही.यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विभागवार चर्चा आणि प्रश्नोत्तराचा तास नसेल, असं सांगण्यात आलंय. ठाकरे सरकारनंही सत्तेवर आल्यापासून स्थगिती आणि आढाव्यापलीकडे काही केलं नाही.


मंत्री आहेत पण खाती नाहीत, दालनं आहेत पण कामं नाहीत अशी परिस्थिती आहे. खातेवाटपाचा पत्ता नाही पण बंगल्यांचं वाटप मात्र तातडीनं झालं. सरकार काम करायला सुरुवात करणार तरी कधी ? हा नोकरशाहीबरोबरच जनतेचाही प्रश्न आहे.


विरोधकांची टीका


हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही, हे पाहुणं सरकार आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी तीनही पक्ष एकत्र आले आहेत, नवं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे, आर्थिक फायद्यासाठी कामांना स्थगिती दिली जात असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला.