`भारत बंद`ला मुंबईत असा मिळतोय प्रतिसाद
कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करत आहेत.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आलीय. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात हा बंद पाळण्यात येणार आहे. कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करत आहेत. पण मुंबईत या बंद ला प्रतिसाद मिळत नसल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे.
मुंबई सुरळीत
मुंबईत सध्याचं जनजीवन सुरळीत असलेलं पाहायला मिळतंय. तूर्तास तरी सर्व परिस्थिती नियंत्रित आहे. टॅक्सी रिक्षा या बंदमध्ये सहभागी नाहीयत. सकाळच्या वेळेत रेल्वे मार्ग बंद करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त इथे पाहायला मिळतोय. एस.टी सेवा सकाळ ऐवजी दुपारनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या व्यतिरिक्त बंदचा फारसा परिणाम मुंबईत दिसत नाही.
पक्षांचा पाठिंबा
काँग्रेसच्या या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपाई गवई गट, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिलाय. या बंदच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही तसंच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वसईच्या माणिकपूर रस्त्यावर वाहनं थांबविण्यास सुरूवात झालीय. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलीय. मोठ्या प्रमाणा रिक्षा देखील बंद आहेत.
बस सेवा बंद
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज एसटी बसेसचं होणारं नुकसान लक्षात घेता सकाळी ७ ते दुपारी ३ यावेळेत बहुतांश ठिकाणी बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. पण दुपारी तीन नंतर राज्यभर बस सेवा सुरू होतील. त्यामुळे गणेशोत्सावासाठी कोकणात सोडण्यात जाणाऱ्या ज्यादा गाड्या दुपारी तीन नंतर सोडण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय.