मुंबई: आगामी निवडणुकांच्यादृष्टीने शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाची कोणत्याही प्रकारची चर्चा सुरु नाही, असे वक्तव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ते सोमवारी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेना व भाजप यांच्यातील निवडणुकीतील जागावाटपाविषयी विचारणा केली. तेव्हा सुभाष देसाई यांनी क्षणाचाही अवधी न लावता शिवसेना-भाजपमध्ये अशी कोणतीही चर्चा न झाल्याचे स्पष्ट केले. देसाई यांच्या या पवित्र्यामुळे आता शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची शक्यता आणखीनच धुसर झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर देऊ नये, असे आदेशही राज्यातील भाजप नेत्यांना देण्यात आले होते. परंतु, शिवसेनेने काही अटीशर्तींच्या मोबदल्यात युतीची तयारी दाखविली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात आणि विधानसभेसाठी ५०-५० टक्के असे जागावाटपाचे सूत्र ठरवावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. परंतु, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हा प्रस्ताव मान्य नाही. त्यामुळे युती झाली तर ठीक नही तो 'पटक देंगे' असे वक्तव्य शहा यांनी लातूर येथील सभेत केले होते. 


या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे सहयोगी खासदार यांनी भाजपला धोक्याचा इशाराही दिला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे त्यांनी सांगितले होते.