मेघा कुचिक, मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास हा सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिल्यानंतर आता CBI आणि मुंबई पोलिसांच्या समन्यवयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. यासाठी आयपीएस अधिकारी सुवेज हक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआय यांच्यामध्ये मध्यस्थी म्हणून ते काम करणार आहेत. सीबीआयची टीम लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. सध्या सीबीआयच्या टीमची दिल्लीत बैठक सुरू असल्याचं देखील कळतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमागचं खरं कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी होत होती. कुटुंबियांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि निकाल हा सीबीआयच्या बाजुने लागला. 


मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा समांतर तपास करणार नसल्याचं याआधीच सरकारने स्पष्ट केलं आहे. सीबीआय संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार असून मुंबई पोलीस आणि राज्य सरकार सीबीआयला या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सुपूर्द करणार आहेत. 


या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काल राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वागत केलं होतं आणि सीबीआयला सर्व सहकार्य केलं जाईल असं सांगितलं होतं.


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची टीम आज संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. सीबीआयच्या टीममध्ये फाँरेन्सिक टीम देखील असणार आहे. सगळ्यात आधी केस डायरी, पंचनामा, मुंबई फाँरेन्सिक रिपोर्ट आँटोप्सी रिपोर्ट हाती घेतला जाणार आहे. आत्महत्या केलेला बांद्राच्या घरीही जाऊन सीबीआयची फाँरेन्सिक टीम तपास करणार आहे.