मुंबई : गणेशोत्सव आणि त्यानंतर काही दिवसांनीच आलेल्या नवरात्रोत्सवाच्या नंतर आता अखेर मांसाहार प्रेमींसाठी खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस आले आहेत. सध्यातही कोणतेही उपवास नसल्यामुळं मांसाहारावर ताव मारण्यासाठी सज्ज असणाऱ्यांनी चिकन, मटण आणि मासे विकत घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असलं तरीही तिथं गेल्यावर या खवैय्यांना दरवाढीचा सामना करावा लागत आहे. मटण आणि चिकनच्या दरात जवळपास 20 रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत झालेल्या दरवाढीचा येथे थेट परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 


फक्त चिकन मटण नव्हे, तर मासळीचा दरही वाढल्याचं दिसून येत आहे. सलग आलेल्या उपवासानंतर मासळी बाजारांच्या दिशेनं अनेकांचीच पावलं वळली आहेत. पण, त्या ठिकाणीही दरवाढीचा सामना करावा लागत आहे. 


मासे आणि चिकन- मटणमध्ये झालेली ही दरवाढ पाहता खानावळ आणि हॉटेलमध्येही उपलब्धतेनुसार दिल्या जाणाऱ्या काही खास पदार्थांच्या दरांतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं चवीनं खाणाऱ्यांना त्यांची न आवरणारी भूक ही दरवाढ पाहून काहीशी आवरती घ्यावी लागत असल्याचंही चित्र आहे.