मुंबई: अमृता फडणवीस आणि शिवसेना नेत्यांमध्ये रंगलेले ट्विटर वॉर दिवसेंदिवस आणखीनच रंगताना दिसत आहे. अमृता फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष असल्याची बोचरी टीका त्यांनी केली होती. या टीकेला शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनतेने काय करावे, हे सांगण्याचा हक्क Axis बँकेच्या कर्मचाऱ्याला नाही. ज्यांनी भिंतीवर खरडवून ठेवले आहे त्यांनी ते वाचायलयाही शिकावे, असा सणसणीत टोला चतुर्वेदी यांनी मिसेस फडणवीसांना लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून या वादाला तोंड फोडले होते. यानंतर ठाकरे सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार Axis बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्याच्या हालचाली सुरु होत्या. शिवसेनेच्या अधिपत्याखालील ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेनेही अशीच पावले उचलण्याचे संकेत दिले होते. हा अमृता फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, तरीही अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरु ठेवले आहे. 


अमृता फडणवीस-शिवसेना वादात AXIS बँकेला फटका बसण्याची शक्यता



या टीकेला शिवसेनेच्या नेत्यांकडूनही जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. यामध्ये प्रियंका चतुर्वेदी आघाडीवर आहेत. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या कालच्या ट्विटला उत्तर देताना प्रियंका चतुर्वेदी यांनी फडणवीस सरकारच्या काळातील निर्णयावर शंका उपस्थित केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात Axis बँकेत खाती वळवण्याचा निर्णय हा हितसंबंधातून घेतला होता का, याची चौकशी व्हावी. तसेच यानंतर Axis बँकेकडून भाजपला किती सीएसआर निधी देण्यात आला का, हेदेखील तपासण्यात यावे, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.