राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या लाखावर, ९५७ रुग्ण बरे - राजेश टोपे
राज्यात आतापर्यंत एक लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ९५७ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
मुंबई :राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाची साखळी मोडण्यात यश आले आहे. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे कोरोना फैलाव मोठ्या प्रमाणात सुरुच असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान होण्यासाठी आणि कोरोना रोखण्यासाठी कोविड-१९ चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हास्तरावर कोरोना चाचणी केंद्र उभारण्यावर प्राधान्य देण्यात येत आहे. काही ठिकाणी चाचणी केंद्र सुरु करण्यास अडचणी आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत एक लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ९५७ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, अशी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची शुक्रवारी नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. काल ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात शुक्रवारी १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूपैकी १२ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
दरम्यान, सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो. ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे. यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणालेत.