किरण ताजणे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सर्व परीक्षा १५ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून या परीक्षा १५ मे नंतर होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने परीक्षा आणखी लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे नर्सिंग, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीतील पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात अगदी विधीवत पार पडलं लग्न

मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वीच माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर नववी आणि अकरावी इयत्तेतील विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


दरम्यान, राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या परीक्षांबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अद्याप घेतलेला नाही, असा खुलासा नुकताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आला होता. 


लॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी

याबाबतचा निर्णय घेण्यासाठी कुलगुरुंची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते.