मुंबई : ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपून हिवाळा ऋतूची सुरुवात असते. त्यासोबतच, ऑक्टोबरची ओळख ही त्याच्या प्रखर उष्णतेसाठी देखील असते. यामुळेच ऑक्टोबर महिन्याला 'ऑक्टोबर हीट' असं देखील बोललं जातं. याच 'ऑक्टोबर हीट'मुळे मुंबईकर (Mumbaikar) हैरान झाले आहेत. आधीच समुद्रामुळे मुंबईमध्ये दमट तापमान असतं यामुळे मुंबईकरांना घामाच्या त्रासाला सामोरं जावं लागत असतं आणि आता त्यात भर पडली ती ऑक्टोबर हिटची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्टोबर हिटमुळे (October Heat) नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय. हा त्रास कमी व्हावा किंबहूना होऊच नाही याकरीता मुंबईकर दुपारी घराबाहेर निघून काम करण्याऐवजी, उन्हाचं प्रमाण कमी असतानाच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे झालेल्या वातावरणीय बदलांमुळे नागरिकांना सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. 


अशी घ्यावी काळजी...


इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर म्हणाले, वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रूग्णांमध्ये वाढ होऊ शकते. वातावरणात अचानक बदल झाला आहे. पावसाळी आणि थंड वातावरणातून आपण थेट कडकडत्या उन्हात बाहेर पडतो. यामुळे व्हायरलच्या समस्या वाढतात. कडकडीत उन्हात बाहेर पडल्याने डिहायड्रेशन होऊन इम्युनिटी खालावते. त्यामुळे ताप, सर्दी तसंच चक्कर येणे, घसादुखी या तक्रारी उद्धवतात.


डॉ. अनिल पुढे म्हणाले, ऑक्टोबर हीटचा त्रास होऊ नये यासाठी घराबाहेर पडताना स्वच्छ कॉटनचे कपडे घाला, दररोज 2 वेळा अंघोळ करा तसंच भरपूर प्रमाणात पाणी प्या. मधुमेही आणि हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांनी या काळात अधिक काळजी घ्यावी.


यंदाच्या ऑक्टोबर हिटमध्ये (October Heat) जाणवणारी उष्णता ही दरवर्षीच्या उष्णतेपेक्षा जास्तीची असल्याची जाणीव होत आहे. वाढत्या उन्हामध्ये नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? यासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांच्यामते, उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील सोडीयमचं प्रमाण कमी होण्यावर होतं. त्यासोबतच, वयवृद्ध आणि मधुमेहींनी या काळात जेवण केल्याशिवाय घराबाहेर पडू नये. शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रीत रहावं आणि या प्रचंड उष्णतेमध्ये शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून ताक किंवा फळांचा रस प्यायला पाहिजे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.