मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आज मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे संकेत उदयनराजेंनी दिले. मात्र साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं. आपल्यापेक्षा जास्त मतं पडलेला उमेदवार दाखवा, आपण त्याचा प्रचार करू अशा शब्दात त्यांनी सुनावलं. आपण सर्वांचेच लाडके आहोत पण पवारांचे जरा जास्तच लाडके असल्यामुळे भीती वाटते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराज म्हणाले, कामानिमित्त मी मंत्रालयात येत असतो, त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या भेटी घेत असतो, आज काही कामाचे उद्घाटन आणि भूमीपूजनाबाबत चर्चा झाली, मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाली.


लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही, त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते, माझा त्याला विरोध नाही, आजचे मंत्री आमदार नसल्यापासून माझे मित्र असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक जण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल.


अगदी मला आडवं करायचं चाललंय, कोण कुणाला आडवं करतं बघू, राजे कुटुंबातील लोक जे लोकांबरोबर राहिले त्यांनाच लोकांनी स्वीकारले. मात्र राजे कुटुंबातील जे लोक लोकांमध्ये मिसळले नाहीत त्यांच्याकडे लोकांनी पाठ फिरवली.


लोकांचा पाठिंबा याला मी खासदार पदापेक्षा जास्त महत्त्व देतो, कुणाला वाटत असेल की मी उदयनराजे पेक्षा जास्त मतांनी निवडून येईन, त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन, असंही उदयनराजे यांनी सांगितलं.