मुंबईसह या शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु, हे आहेत नियम
राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडली आहे.
मुंबई : राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडणार आहे. ओला-उबेर टॅक्सी सुरु झाल्याने सर्वसामान्यांना आणि कार्यालयात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन हळहळू अनलॉक करण्यात येत असल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळतानाच जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कालपासून मुंबईतील काही ठिकाणी दुकाने सुरु झाली आहेत. आता टॅक्सी धावणार असल्याने अनेकांना प्रवास करता येणार आहे.
राज्य सरकारने अत्यावश्यक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ओला-उबर कंपन्यांच्या अॅप बेस्ड टॅक्सीसेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित प्रवास करण्यासाठी शासनाने काही नियमांचे पालन काटेकोर करण्याचे स्पष्ट बजावले आहे. हे नियम पाळले तर नागरिकांना प्रवास करता येईल. शहरांतर्गत सेवेसह आंतरजिल्हा वाहतुकीसाठी ही टॅक्सी सेवा सुरु करण्याची घोषणा ओला-उबेरने केली आहे.
ओला-उबेर टॅक्सी सुरु होत असल्याने सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रवास कसा करायचा, याची चिंता थोडी कमी झाली आहे. लोकल बंद असल्याने एसटी-बेस्ट फेऱ्यांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका होता. यामुळे कार्यालय कसे गाठायचे, असा सवाल उपस्थित होत होता. त्यामुळे हा प्रश्न काहीप्रमाणात मिटणार आहे.
मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अन्य शहरांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे, असे ओलाचे प्रवक्ते आनंद सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले आहे. तर उबेरच्या उबेर गो, प्रीमिअर आणि ऑटो रिक्षा प्रवास करण्याची मुभा आहे. सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रवाशांना आवश्यक कागदपत्रांसह सुरक्षित वावरच्या नियमांचे योग्य पालन करुन प्रवाशांना प्रवास करता येईल, असे उबेरच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार वाहतूक रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी, आणि कॅबचालकांना वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवासी आणि ओला टॅक्सी चालकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट बजावण्यात आले आहे.
- मास्कचा वापर अनिवार्य
- निर्जंतुकीकरण करुनच प्रवास करणे गरजेचे
- रिक्षा-टॅक्सीमध्ये २ प्रवासी आणि ७ आसनी गाडीत ४ प्रवासी असावेत