मुंबई: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. शिवसेनेला जुनेजाणते व नवे तडफदार मोहरे निवडावे लागतील. महाराष्ट्राच्या राजकारणात आता ताजेतवाने चेहरे यावेत, अशी अपेक्षा आहे. मुरलेला मुरंबा आणि लोणची जेवणात बरी, म्हातारे नवरेही गमतीलाच बरे, अशी लोकभावना आहे. पण तरीही जुने नेते तरुणांसाठी खुर्च्या सोडायला तयार नाहीत. आपण नसलो तर महाराष्ट्राचे किंवा सरकारचे अडेल, या भ्रमातून महामंडळींनी बाहेर पडायला पाहिजे, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच मित्रपक्षांनीही मलईदार किंवा वजनदार खात्यांचा आग्रह सोडावा, असे या अग्रलेखातून सूचित करण्यात आले आहे. मलईदार समजल्या जाणाऱ्या खात्यातून जनतेची सेवा करता येते असे ज्यांना वाटते त्यांची नियत साफ नाही. मदत व पुनर्वसन, आयटी, कौशल्य विकास, शालेय शिक्षण आणि आरोग्य अशा खात्यांना हात लावायला कुणी तयार नाही. ही काय खाती आहेत का, असा प्रश्न विचारला जातो. मराठी भाषा, सांस्कृतिक खात्यातही कुणी रमायला तयार नाही. गृह, नगरविकास, बांधकाम आणि पाटबंधाऱ्यावर जीवनाचे सार आहे, असे वाटत असेल तर लोकसेवा आणि राज्याचे हित या शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल, असेही अग्रलेखात म्हटले आहे. 


शिवसेनेच्या या एकूणच भूमिकेमुळे मंत्रिमंडळात नवे चेहरे पाहायला मिळतील, अशी शक्यता आहे. मात्र, त्यासाठी पक्षातील कोणत्या ज्येष्ठांना डच्चू दिला जातो, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. 



दरम्यान, आजपासून नागपूरात सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही यात सहभागी होणार आहोत. पण विषय कोणापुढे मांडायचे, आमच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.