Omicron Variant : मुंबईत आढळला ओमायक्रॉन बाधित रुग्ण, महापालिकेच्या चिंतेत वाढ
मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे
मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) जगभरात दहशत पसरवली आहे. देशातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. आता मुंबईतही ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. मुंबईतल्या सर्वात मोठ्या आणि गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे.
टांझानियामधून धारावीत आलेल्या कोरोना रुग्णाला ओमायक्रॉन झाल्याचं स्पष्ट झालंय. सध्या या रुग्णावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. धारावीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पूर्व अफ्रिकेतील टांझानिया इथून ही व्यक्ती धारावीत आली होती. या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता, त्यानंतर त्याला मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. धारावीत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णामुळे मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लानही तयार करण्यात आला आहे.
10 रुग्णांना डिस्चार्ज
भारतात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २५ होती. यापैकी राजस्थानमधील १० आणि महाराष्ट्रातल्या कल्याण-डोंबिवलीतील एका रुग्णाने ओमायक्रॉनवर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.