Omicron Update : महाराष्ट्रात चिंता वाढली, आणखी 8 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे
मुंबई : महाराष्ट्रात ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या आणखी 8 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 रुग्ण पुणे तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनची रुग्णांची संख्या 40वर गेली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक 14 रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड 10, पुणे ग्रामीण 6, पुणे मनपा 2, कल्याण डोंबिवली 2, उस्मानाबाद 2, बुलडाणा 1, नागपूर 1, लातूर 1 आणि वसई विरारमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे 25 रुग्णांचे आरटीपीआर रिपोर्टर निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातू डिस्चार्ज देण्यात आला आहे.
8 रुग्णांची माहिती
आज आढळलेल्या 8 रुग्णांचे नमुणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. हे सर्व रुग्ण 29 ते 45 वर्ष वयोगटातील आहेत. यापैकी 7 रुग्णांना कोणतीही लक्षण नाहीत, तर एका रुग्णात सौम्य लक्षण आढळलं आहे. प्राथमिक माहितीनुसार पुणे इथल्या चार रुग्णांनी दुबई प्रवास केला होता. तर रुग्ण हे त्यांच्या निकटसहवासातील आहेत. मुंबई इथल्या एका रुग्णाचा अमेरिका प्रवासचा इतिहास आहे. तर कल्याण आणि डोंबिवली इथला रुग्ण नायजेरीयातून आला होता.
8 रुग्णांपैकी 2 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर 6 रुग्ण घरी विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सर्वांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
राज्यात आज आढलेले कोरोना रुग्ण
राज्यात गेल्या चोवीस तासात 902 रुग्णांची नोंद झाली आहे. तर बारा जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 680 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 97.71 टक्के एवढं झालं आहे.