मुंबई : आखाती देशात नोकरीला गेलेल्या एकाला सहार पोलिसांनी शनिवारी अटक केली. बनावट पासपोर्टच्या आधारे परवेझ आलम मोहम्मद रिजवान हा परदेशात नोकरीला जात होता, त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


दोन वर्षांपूर्वी तो नोकरीसाठी कतारमध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परवेझ हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी तो नोकरीसाठी कतार देशात गेला होता. वर्षभर तेथे त्याने खासगी ठिकाणी नोकरी केली. गेल्या वर्षी तो भारतात आला. त्याला पुन्हा कत्तारला नोकरीसाठी जायचे होते. 


नवीन नोकरीसाठी पासपोर्टची आवश्‍यकता होती


कतारला नातेवाइकांकडे तो कामाला राहणार होता. नवीन नोकरीसाठी पासपोर्टची आवश्‍यकता होती. त्यामुळे पासपोर्टसाठी परवेझने एकाला काही रक्कम दिली. रक्कम दिल्यावर त्याने पासपोर्टचे पत्र कत्तार येथील एका व्यक्तीला व्हॉट्‌सऍपवर पाठवले. पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बुधवारी सकाळी परवेझ सहार विमानतळावर आला. विमानाने त्याने दोहापर्यंत प्रवास केला. 


तपासणीत पासपोर्ट बनावट असल्याचे उघड


दोहा विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याच्या पासपोर्टची तपासणी केली. तपासणीत पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. परवेझच्या बनावट पासपोर्टप्रकरणी दोहा विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सहार विमानतळ अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्याला शनिवारी भारतात पाठवले. सहार विमानतळावर आल्यावर परवेझला विमानतळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.