एलफिन्स्टन पूल दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण
आजही या घटनेच्या आठवणीने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो.
मुंबई : मुंबईतल्या एलफिन्स्टन पूल दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय. 29 सप्टेंबर 2017 रोजी या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांना जीव गमवावा लागला होता. याच निमित्त घटनास्थळी या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येते. आजही या घटनेच्या आठवणीने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो.
अशी घडली घटना...
२९ सप्टेंबर २०१७च्या आधीचे कित्येक दिवस पावसानं दडी मारलेली... त्यामुळे बऱ्याच जणांकडे छत्र्या नव्हत्या. त्यामुळे एलफिन्स्टनच्या पूलावर अनेक जण आडोशाला थांबले. तेवढ्यात फूल गिला याचं रुपांतर पूल गिरामध्ये झालं. याच अफवेने २३ निरपराध नागरिकांचे बळी घेतले.
पूलांचा मुद्दा समोर
एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांवरच्या अरूंद पूलांचा मुद्दा समोर आला. पश्चिम रेल्वेचं एलफिन्स्टन आणि मध्य रेल्वेचं परळ या दोन्ही स्थानकांचा भार या पूलावर येत होता. त्यावर वारंवार तक्रारी करुनही उपयोग झाला नव्हता. २३ बळी गेल्यावर सगळ्याच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.
लष्करी पूल
रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्करावर उपनगरीय रेल्वे मार्गावरचे तीन पादचारी पूल उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. लष्कराचे सैनिक वेगानं कामाला लागले आणि विक्रमी वेळेत लष्करानं पूल बांधला.