प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (एसजीएनपी) नावे इंटरनेटवर दिशाभूल करणारा मोबाईल नंबर देत अज्ञात व्यक्तीने पर्यटकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एसजीएनपीद्वारे यासंदर्भात पोलीस तक्रार देण्यात आली असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसजीएनपीबद्दल माहिती मिळविण्यासाठी पर्यटक www.sgnp.maharashtra.gov.in वर माहिती मिळवतात. उद्यानातील महत्त्वाची स्थळे तसेच मनोरंजनाच्या ठिकाणाचे शुल्क यासंदर्भातील माहिती याठिकाणी पाहायला मिळते. शैलेंद्र मिश्रा यांनी देखील याप्रमाणे शोध घेतला. पण त्यांची दिशाभूल झाली. ते एका लिंकवर गेले तिथे त्यांना ९३३०२७२२६७ हा मोबाईल नंबर दिसला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १५,३३० रुपये वळते झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलीस यासंदर्भातील अधिक तपास करत आहेत. 



संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासंदर्भातील अधिकृत माहितीसाठी पर्यटक ९१२२२८८६८८६ या क्रमांकावर संपर्क साधवा किंवा गुगलकडे रिपोर्ट नोंदवावा. ऑनलाईन शोध घेताना उद्यानाच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या आणि संपर्क साधा असे आवाहन एसजीएनपी मुख्य वनरक्षक आणि संचालक अनवर अहमद यांनी केले आहे.