मोबाईलच्या साहाय्यानं बुक करा `सीएनजी`, मात्र टॅक्सी चालकाचा याला विरोध !
सीएनजी भरण्यासाठी लोक दोन-दोन तास रांगेत उभे राहिलेले दिसतात. मुंबईत दररोज ३ लाख गाड्या सीएनजी भरतात. सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते
मुंबई : तुमच्याकडे सीएनजी इंजिन असलेली गाडी असेल तर अर्थातच तुमचा बराच वेळ सीएनजी भरण्यासाठी वाया जात असेल... सीएनजी भरण्यासाठी लोक दोन-दोन तास रांगेत उभे राहिलेले दिसतात. मुंबईत दररोज ३ लाख गाड्या सीएनजी भरतात. सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते. याच्यावरच उपाय म्हणून 'महानगर गॅस लिमिटेड'ने एक नवीन युक्ती शोधून काढलीय. त्यामुळे, सीएनजी गाडी धारकांचा बराचसा वेळ वाचू शकतो.
'सीएनजी'साठी असं करा बुकींग
मोबाईल अॅप्लिकेशन किंवा एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही तुमचं बुकींग करू शकाल. MGL e-tokken या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे तुम्ही ही बुकींग करू शकाल. हे अॅप तुम्ही प्ले-स्टोअरद्वारे डाऊनलोड करू शकता... तसेच एसएमएसच्या माध्यमातून बुकिंग करण्यासाठी ८४२२८०२२८० नंबरवर मॅसेज करावे लागणार आहे.
काय माहिती द्याल?
या App आणि SMS मध्ये तुम्हाला खालील माहिती देणं गरजेचं आहे.
१) CNG स्टेशन कोड (जो तीन अंकाचा असेल)
२) त्यानंतर तुम्हाला तीन चाकी गाडी असेल तर ३ आणि चार चाकी गाडी असेल तर ४ हा अंक लिहावा लागेल
३) गाडी नंबरचे शेवटचे 4 अंक द्यावे लागतील
४) वेळ ताशी फॉर्मेटमध्ये लिहिणे आवश्यक आहे
प्रायोगिक तत्वावर सुविधा सुरू
बुकिंग केल्यानंतर अॅपद्वारे तुम्हाला टोकन दिलं जाईल. टोकन मिळाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत तुम्हाला सीएनजी भरता येईल. याचे स्लॅाट सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. सध्या या सुविधा प्रायोगिक तत्वावर मुंबईतील ताडदेव, सायन आणि देवनार या भागात सुरु केल्या आहेत... ही कल्पना यशस्वी ठरली तर महानगर गॅसच्या १३५ पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
टॅक्सी युनियनचा विरोध
मात्र, या सुविधेला टॅक्सी चालकांकडून विरोध करण्यात येतोय. बहुतेक चालक या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात असमर्थ ठरतील... त्यामुळे त्यांना पेट्रोल पंपावर मोठ्या गर्दीचा सामना करावा लागणार आहे. यामुळे त्यांच्या वेळेचंही नुकसान होईल... त्यामुळेच, येत्या गुरुवारी टॅक्सी युनियननं याचा विरोध करण्यासाठी प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतलाय.