मुंबई: सध्याच्या बिकट परिस्थितीमधून शरद पवारच राज्याला बाहेर काढू शकतात, असे वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे. त्या बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अतिश्य बिकट आहे. शेतकरी ढसाढसा रडत आहेत. अशावेळी शिवसेना आणि भाजप यांना बहुमत मिळूनही सत्तास्थापन होऊ शकलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी शरद पवार हे एकमेव व्यक्ती आहेत, जे महाराष्ट्राचे संरक्षण करू शकतात. तेच राज्याला या संकटातून बाहेर काढू शकतात, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; शिवसेना मोठा निर्णय घेणार?


राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून मुंबईतील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. यशोमती ठाकूर या आज सकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पडद्यामागे हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. 


जे ठरलंय तेच होईल, शिवसेना नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही- राऊत


यानंतर शिवसेना नेते संजय राऊत हेदेखील शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी या भेटीपूर्वी पत्रकारपरिषदही घेतली. यावेळी त्यांनी भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर धुडकावून लावली होती. शिवसेना कोणत्याही नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही, जे ठरलंय तेच होईल, असे त्यांनी सांगितले.