१ मेपासून एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद - पर्यावरण मंत्री
राज्यात येत्या १ मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
मुंबई : राज्यात येत्या १ मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल अर्थात एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली. प्लास्टिक बंदी असूनही काही भागात प्लास्टिक पिशव्यांची देवाणघेवाण खुलेआम सुरू असल्यासंदर्भात काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.
प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उत्पादित केल्या जात आहेत. या बंदीतून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर लगेचंच बंदी आणता येणार नाही हा मुद्दा धार्मिक भावनेशी निगडीत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.