विरोधी पक्ष डिझास्टर टूरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण: सध्या लोकांना फिट ठेवण्यावर सध्या आमचा भर असून विरोधीपक्ष मात्र डिझास्टर टुरिजममध्ये व्यस्त असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मिरा भाईंदर, पनवेल, उल्हासनगर, वसई विरार महापालिका परिसरातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व पालिकेचे आयुक्त उपस्थित होते त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.
आनंदाची बातमी: भारताचा रिकव्हरी रेट सुधारला, ५ लाख लोकांची कोरोनावर यशस्वी मात
लोकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून फिट कसे ठेवता येईल याचे मुख्य आवाहन आहे. हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणारे धारावी मॉडेलचे किरण दिघावकरही या बैठकीला उपस्थित होते. एमएमआर रिजनमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय प्रतिसाद आणि मेडीकल इमर्जन्सी हे दोन महत्वाचे घटक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर याठिकाणी आम्ही जम्बो बेड्सची सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, ऍम्ब्युलन्स आदींची सुविधा वाढवत आहोत. मुंबईप्रमाणे इकडेही अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचाही विचार या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक
काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टीका केली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टूरिझम करत आहे. तर आम्ही मात्र लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच आम्ही जशी लोकांची काम करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर हे जगातील सर्वात मोठे पॅनडेमिक असून एका शहरापुरता मर्यादित नाही. विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.