धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक

कोरोनाचे संकट यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या जगातील काही भागांचा उल्लेख केला

Updated: Jul 10, 2020, 10:27 PM IST
धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक

मुंबई: जागतिक आरोग्य यंत्रणेचे WHO प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी शुक्रवारी मुंबईच्या धारावी परिसरात कोरोना व्हायरसचा Coroanvirus प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. कोरोनाचा प्रादुर्भावकितीही तीव्र असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, हे धारावीने सिद्ध करून दाखवल्याचे त्यांनी सांगितले. 

टेड्रोस घेब्रेयसिस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या जगातील काही भागांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, व्हिएतनाम, कंबोडिया, न्यूझीलंड, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया, तसेच अत्यंत दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या मुंबईतील धारावी परिसरात सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन आणि आजारी लोकांवर उपचार हेच कोरोनाची साखळी तोडण्याचे मार्ग आहेत. जगभरात अशी आणखी अनेक उदाहरणे सापडतील. यावरुन एकच सिद्ध होते की, कोरोनाचा प्रादुर्भाव कितीही तीव्र असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे घेब्रेयसिस यांनी म्हटले. 

मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार व्हायला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. याठिकाणी अत्यंत दाटीवाटीची वस्ती असल्याने धारावीत मोठी मनुष्यहानी होईल, अशी भीती वर्तविली जात होती. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत धारावीत दररोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत होते. त्यामुळे सर्वांनाच धडकी भरली होती. मात्र, यानंतर मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने धारावी केलेल्या आक्रमक उपाययोजनांमुळे धारावी परिसरातील कोरोनाचा प्रभाव ओसरायला सुरुवात झाली होती.