मुंबई : सोमवारी सकाळी संपूर्ण मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात वीजपुरवठा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं ग्री़ड फेल्युअरमुळं जवळपास सव्वा तासाहून अधिक काळासाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि काहीशी गती पकडणारं हे शहर अक्षरश: थांबलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यांवरी सिग्नल यंत्रणांपासून ते अगदी रेल्वेसेवाही ठप्पा झाल्या आणि जनजीवन विस्कळीत झालं. दुसरीकडे ऑनलाईन कार्यप्रणालीच्या आधारावर सुरु असणाऱ्या शाळांचे वर्गही खोळंबले, तर कुठं विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये व्यत्यय आला. ही एकंदर परिस्थिती पाहता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तासाभरातच वीजपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन जनतेला दिलं. पुढील काही तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीतही झाला. पण, या काही तासांमध्ये विरोधकांनी मात्र सत्ताधारी महाविकासआघाडीवर लगेचच निशाणा साधण्यास सुरुवात केली. 


ठाकरे सरकार आल्यापासून एमएमआर क्षेत्रात बहुतांश वेळांना अंधारच असल्याचं म्हणत भाजपच्या किरिट सोमय्या यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. 'ठाकरे सरकार आल्यापासून मागील दोन- चार महिन्यात मुंबई एमएमआर भागात अंधारच असतो. रोज एक एक तास लाईट जाते. इथं पूर्ण एमएमआरमध्ये बत्ती गुल झाली आहे. आता हे नेमकं का आणि कसं झालं याचं अध्ययन केलं जाणं गरजेचं आहे आणि मागील काही महिने येथे रोज वीजपुरवठा खंडित होत आहे', असं म्हणत सोमय्या यांनी यावर ठाकरे सरकार काय तोडगा काढेल, असा प्रश्न उपस्थित केला. 


तर, आशिष शेलार यांनी सध्याचं सरकार हे वीज बिल माफ करण्याऐवजी जनतेला वीजेपासूनच माफ करायला निघालं आहे असं म्हणत सरकारवर निशाणा साधला. 'कोरोना काळात कोरोनाग्रस्त आणि इतर रुग्णांवर उपचार सुरु असतेवेळी कुठंही बाधा पोहोचू नये. अशा वेळी दुरुस्ती आणि देखभालीचं काम होणार असेल तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था असायलाच हवी', असं म्हणत त्यांनी राज्यातील आघाडी सरकारला धारेवर धरलं. ठाकरे सरकार काय दिवे लावतंय त्यामुळं परिस्थिती नागरिकांच्या जीवावर बेतत आहे असं म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 


 



सरकारच्या नियोजनशून्यतेला यासाठी जबाबदार ठरवत त्यांनी विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली. वीजपुरवठा खंडित होताच उदभवलेल्या परिस्थितीमागं सर्किटचं कारण देणाऱ्या या सरकारचंच सर्किट जागेवर आहे का, असा थेट सवाल उपस्थित करत शेलार यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना झटका दिला.