विरोधकांनी वर्षभर आत्मचिंतनासाठी चारधाम यात्रेस निघून जावे; शिवसेनेचा खोचक सल्ला
लोकशाही आणि निवडणुकांत जय-पराजय होतच असतात
मुंबई: लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेनेने विरोधकांना एक खोचक सल्ला दिला आहे. स्वत:ला विरोधी पक्ष समजणाऱ्यांचा आवाज अत्यंत क्षीण झाला आहे. यामधून सावरायचे असेल तर त्यांनी पुढील वर्षभर आत्मचिंतनासाठी चारधाम यात्रेस निघून जायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांचे अक्षरश: पानिपत झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे.
या अग्रलेखात म्हटले आहे की, जे स्वतःला विरोधी पक्ष समजतात त्यांचा आवाज संसदेत व बाहेर इतका क्षीण झाला आहे की, पुढील वर्षभर आत्मचिंतनासाठी त्यांनी चारधाम यात्रेस निघून जायला हवे. गेला बाजार मक्का, मदिना, व्हॅटिकन सिटीचेही दर्शन करून यावे. कारण या धक्क्यातून सावरणे त्यांना कठीण आहे आणि मनःशांतीसाठी हिमालयात जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने बरे आहे. मोदी हे केदारनाथला एक दिवसासाठी गेले व विरोधकांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले; पण मोदींना ईश्वराचे आशीर्वाद लाभले व आता हिमालयात राख फासून जाण्याची वेळ विरोधकांवर आली आहे, असा टोला या अग्रलेखात लगावण्यात आला आहे.
तसेच जनतेने मोदींना सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. तो खुल्या मनाने स्वीकारणे यातच दिलदारी आहे. लोकशाही आणि निवडणुकांत जय-पराजय होतच असतात, पण लागोपाठ दोनदा आपला दारुण पराभव का झाला याचे विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोदी यांना देशाचे राजशकट चालवायचे आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नये, यातच त्यांचे हित असल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.