कल्याण : कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा देखील भासत आहे. अशा परिस्थितीत 'थॅलिसीमियाग्रस्त' मुलांना रक्ताचा पुरवठा होणं देखील कठीण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात विविध सामाजिक संस्था, महापालिका कर्मचारी, पत्रकार आणि अनेक जागरूक नागरिकांनी यात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोवीडच्या दुसऱ्या लाटेमध्ये संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने 'रक्तदाना'साठी पुढे येण्याचे कल्याण-डोंबिवली महापालीकेकडून आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनाची दखल घेत कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. 


थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्तपुरवठा करणाऱ्या ठाण्यातील रोटरी क्लबच्या ब्लडबँकेकडे हे रक्त जमा करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे कोरोना व्हायरसच्या सर्व नियमांचे पालन करत 55 हून अधिक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.  यामध्ये कल्याणातील वॉर सामाजिक संस्था, महापालिका सुरक्षा रक्षक, पत्रकार  आणि विविध जागरूक नागरिकांचा मोठा सहभाग होता.