प्रशांत अंकुशराव, मुंबई :   कोरोनाग्रस्त मृतदेहांवर विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने त्यावर ताण वाढला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या काही स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिन्या बंद पडल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपर पूर्व येथील स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनी बंद पडली. त्याआधी चेंबूर येथील विद्युत शवदाहिनीही बंद पडली. एकापाठोपाठ विद्युत शवदाहिनी बंद पडल्याने मृतांच्या नातेवाईकांना त्रास होत आहे.


कोरोनाग्रस्त मृतांवर सध्या विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. याआधी स्मशानभूमीमधील विद्युत शवदाहिन्यांचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात केला जात नव्हता. अचानक विद्युत शवदाहिन्यांवर ताण वाढल्याने त्या बंद पडू लागल्या. चेंबुरमधील आर. सी. मार्ग स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनी बंद पडल्यानंतर घाटकोपर पूर्व येथील स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीवर अधिक ताण आला. त्यामुळे घाटकोपरची विद्युत शवदाहिनीही बंद पडली.


चेंबुर आणि घाटकोपरमधील विद्युत शवदाहिन्या बंद पडल्यानंतर तेथील मृतदेह विक्रोळी येथे पाठवण्यात येत आहेत. सुरुवातीला तेथे हद्दीचाही वाद झाला. विक्रोळीतील विद्युत शवदाहिनीतही आता ताण वाढला आहे.


या प्रकरणी घाटकोपरच्या महापालिका सहाय्यक आयुक्तांनी इतर ठिकाणी व्यवस्था करण्याचे आणि या हद्दीतील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहेत.


 



एरवी विद्युत शवदाहिनीत कमी प्रमाणात अंत्यसंस्कार होत असतात. कोरोनामुळे विद्युत शवदाहिन्यांवरील ताण वाढला आहे. याबाबत महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.