रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा
आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असेल.
मुंबई: कोविड-१९ उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असेल. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही.
राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा - डॉ. राजेंद्र शिंगणे
कोविड-१९ रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा.५३) चे कलम ३८ चे उप कलम (१) आणि उपकलम (२) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम- १९८७१८९७ चा ३) चे कलम 2 अन्वये यासाठी या वाहनांना रुग्णवाहिकांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहीका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे. अशा वाहनांना केंद्रिय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १०८ च्या उप नियम (७) तसेच नियम ११९ च्या उप नियम (३) च्या तरतूदी लागू करण्यात येत आहे, असे गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई, पुणे, अंबरनाथ आणि बदलापुरात लिक्विड ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा थोड्यावेळासाठीही थांबल्यास रुग्णांचा जीव जाण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने रुग्णालयांना करण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी औद्योगिक क्षेत्राला पुरवणाऱ्या जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली होती. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० हून अधिक बेडस् असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची ऑक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाईप सिलिंडर- १५४७, डयुरा सिलिंडर- २३०, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरु आहे.