रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : पाणीपुरी..नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. हा पदार्थ म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा. साधी पाणीपुरी, जिरा पाणीपुरी, पुदिना पाणीपुरी, मसाला पाणीपुरी ही तर सर्वांनीच खाल्ली असेल पण पाणीपुरीतही अनेक भन्नाट प्रकार आहेत बरं का. विले पार्ले इथं असाच एक मस्त पाणीपुरी महोत्सव रंगला. लोकमान्य टिळक संघ आणि युवा मंचच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिझ्झा पाणीपुरी शॉट्स, इटालियन पाणीपुरी, मिसळ पाणीपुरी, चॉकलेट पाणीपुरी, चायनिज पाणीपुरी, फ्रुट जेली पाणीपुरी, पान शॉट पाणीपुरी जितकी नावं घेऊ तितकी कमी आहेत. या हटके पाणीपुरी म्हणजे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य होते. 40 रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत या पाणीपुरी उपलब्ध होत्या. पाणीपुरी प्रेमींनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट दिली. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ लोकांनी या हटके पाणीपुरीचा आस्वाद घेतला. 


लोकांनी एकत्र येत मजा करावी या हेतुने युवा मंचतर्फे नेहमीच वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. यापूर्वी मिसळ महोत्सव, फिटनेस महोत्सव असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. तर यापुढेही त्यांचा हाच प्रयत्न असल्याचं युवा मंचच्या सचिव रसिका जोशी यांनी सांगितलं आहे. एकंदर काय तर मुंबईकर या पाणीपुरी महोत्सवाला भेट देऊन एकदम तृप्त झाले असे म्हणायला हरकत नाही.