पोलीस महासंचालकपदी पडसलगीकर तर जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
पाहा कोण झाले मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाली असून थोड्याच वेळात ते पदभार स्वीकारणार आहेत. सुबोध जयस्वाल गेल्या काही दिवसांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. तिथून त्यांना परत महाराष्ट्रात बोलावून आज त्यांना आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे. विद्यमान पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे. आज राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर निवृत्त झाले. त्यांच्या जागी बढती मिळाल्यानं पडसलगीकर यांची जागा रिक्त झाली. त्याच जागेवर सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक सतिश माथुर हे पोलीस दलातून निवृत्त झालेत. मुंबईच्या नायगाव येथील पोलीस मैदानात त्यांचा निवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी पोलीस दलातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महासंचालकांचं वाहन ओढत नेऊन त्यांना निरोप दिला.