`उद्धव ठाकरेंच्या राज्यात... ` नितेश राणेंची टीका
पालघर प्रकरणावरून टीका
मुंबई : पालघर प्रकरणानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'पालघर घटनेवरून असे दिसते की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. खालच्या स्तरावर काय घडते यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. लोकांचा संयम सुटत असून ही सुरूवात आहे. सरकार एकूणच नियंत्रण गमावत आहे', अशा शब्दात नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
नितेश राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात तुलना केली आहे. बाळासाहेबांच्या राज्यात हिंदू आहोत हे गर्वाने सांगितलं जात होतं. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या राज्यात हिंदू असाल तर घाबरून रहावे लागते, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये केली आहे. (पालघर हत्याप्रकरणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले, म्हणाले...)
सध्या राज्यभर गाजत असलेल्या पालघर हत्याप्रकरणाबाबत अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी रविवारी रात्री ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.