पालघर हत्याप्रकरणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले, म्हणाले...

या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल

Updated: Apr 19, 2020, 11:32 PM IST
पालघर हत्याप्रकरणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले, म्हणाले... title=

मुंबई: सध्या राज्यभर गाजत असलेल्या पालघर हत्याप्रकरणाबाबत अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी रविवारी रात्री ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालघरमधील घटना अमानवीय, पोलिसांवर कारवाई करा- फडणवीस

तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पालघर हत्याकांडाप्रकरणी १०१ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे देशमुख यांनी म्हटले. 
गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्याच्या काही भागात सध्या चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. चोर माणसांनाचही पळवून नेतात आणि किडणी काढून विकतात अशा अनेक अफवा परिसरात पसरल्या आहेत. या अफवांवर विश्वास ठेवून लोक रात्रीची गस्त घालत आहेत. गुरुवारी रात्री अशाच गैरसमजातून जमावाने तिघांचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि पोलिसांच्या गाडीतच तिघांना दगड, बॅट आणि बांबूने ठेचून तिघांची हत्या केली.

हत्या झालेले तिघेजण कांदिवली येथे राहणारे होते. तिघेही मयत हे त्रंबकेश्वरचे दक्षिणमुखी आखाड्याशी संबंधित आहेत. हे तिघे दादरा नगर हवेलीकडे जायला निघाले होते. खरे तर लॉकडाऊन असल्याने रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान या गावात गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी या तिघांना जबर मारहाण केली.