मुंबई  : शिवसेनेकडून जी ऑडिओ क्लिप दाखविण्यात आली आहे ती माझीच आहे. मात्र, त्यात छेडछाड करण्यात आलेय. त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपमध्ये काहीही तथ्य नाही. शिवसेनेने खालच्या पातळीवर राजकारण केलेय, असे उत्तर शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. आता शिवसेनेकडूनही आव्हानात्मक उत्तर आलेय. आम्ही चुकीचे असू तर जी सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. पण त्यात काही मोडतोड झाली नसेल तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना आमदार अनिल परब यांनी थेट आव्हान मुख्यमंत्र्यांना दिलेय. सुदैव आहे की मुख्यमंत्र्यानी हे मान्य केले की तो आवाज त्यांचा आहे. ऑडिओ क्लिपमधील भाषा मुख्यमंत्र्याना शोभनिय नाही. जर क्लिप तोडून मोडून दाखवली, असा त्यांचा दावा असेल तर त्यांना आमचं जाहीर आवाहन आहे. या क्लिपबाबत आजच्या आज फैसला करण्यात यावा.



मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्रीही आहेत. फॉरेन्सिक लॅब त्यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यांनी आयोगाला विनंती करावी की आजच्या आज निर्णय घ्यावा. तज्ज्ञ बोलवा, लोकप्रतिनिधी बोलवा. समोरासमोर तपासून घ्या की ही एडिटेड क्लिप आहे का ?आम्ही चुकीचे असू तर जी सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. पण त्यात काही मोडतोड झाली नसेल तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल अनिल परब यांनी केलाय.


क्लिपमध्ये वादग्रस्त चुकीचं काही नसेल तर मुख्यमंत्री का घाबरत आहेत ? मुख्यमंत्रयांच्या पायाखालची वाळू सरकत चाललीय. सभ्य मुख्यमंत्र्याच्या तोंडी दादागिरीची भाषा शोभते का, मुख्यमंत्र्याना सावलीचीही भीती वाटू लागली आहे का ? आदी प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.