COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाने मला खूप आनंद झालाय, असं म्हणत आपला आनंद व्यक्त करताना 'हा ऐतिहासिक विजय आहे', असा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय. विरोधकांमध्ये सुरुवातीपासून सुसूत्रता नव्हती याचा फटका त्यांना बसला. राजकारणातील अपरिपक्वतेची परिसीमा त्यांच्याकडून गाठली गेली. आमच्या रमेश अप्पा कराड यांना राष्ट्रवादीने फोडून नेलं पण ऐन वेळीस राष्ट्रवादीतून त्यांच्यावर जो दबाव आणला त्यामुळे त्यांनी माघार घेतली. परभणीचा सिटिंग आमदार सोडून दुराणी यांना डावलल्याने विरोधकांचा पराभव झाला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. 


भाजपचा उमेदवार इथून निवडून येईल असा मला कधीच वाटलं नव्हतं. सुरेश धस यांचा अखेर विजय झाला आहे. शरद पवार यांनी स्वतः सांगितलं की आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून त्यांच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतली, त्यामुळे माझ्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचं कारण नाही, असंही स्पष्टीकरण आपल्या विजयावर पंकजा यांनी दिलंय. 


धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसलाय. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा वरचष्मा असणाऱ्या लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपचे सुरेश धस विजयी झालेत. राष्ट्रवादीचा हा पराभव काँग्रेस राष्ट्रवादीमधला दुरावा अधिक वाढवणारा ठरणार आहे. या निकालाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय यांना पुन्हा एकदा धोबीपछाड देत बेरजेच्या राजकारणाची सुरवात केलीय. 


५२७ मते असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ७६ मतांनी पराभव पत्करावा लागला म्हणजेच आघाडीची मोठ्या प्रमाणात मतं फुटली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. 
भाजपचे रमेश कराड यांना राष्ट्रवादीत घेत धनंजय यांनी धक्का दिला होता, तर कराड यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून पंकजा यांनी धनंजय यांच्यावर कुरघोडी केली होती. आता अखेर या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस विजयी झालेत. दरम्यान काँग्रेसनं विश्वासघात केला, आमच्यासोबत राहून भाजपला मदत केली, असा आरोप पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांनी केलाय.