मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथ काही थांबायचं नावं घेत नाही. अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे भाऊ आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर राजकारणातून काही अलिप्त अशा राहिल्या. पण त्यांनी आज फेसबुक पोस्ट लिहून आपल्याला स्वतःशी संवाद साधायला वेळ हवाय असे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळी मतदार संघातून पराजय झाल्यानंतर पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या प्रश्नांवर थोडा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ हवा आहे. याकरता त्या आठ ते दहा दिवस कुणाशीही संपर्क साधणार नाहीत. 



12 डिसेंबर रोजी भाजप दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या दिवशी त्या सगळ्यांना मनसोक्त बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय? 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे का वेगळा निर्णय सगळ्यांसमोर मांडणार आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ('त्या' वादग्रस्त व्हिडिओवरून धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल)


धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ते पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा भाजपाचा आरोप होता. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर परळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हा सगळा प्रकार निवडणुकीच्या अगोदर झाला. या सगळ्याचे पडसाद निवडणुकीत आणि निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाले. 


परळी मतदार संघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडून पराभव झाला. त्यावेळी पंकजा मुंडेंनी 'लोकांनी माझा स्वीकार केला नाही' यावर भर देत आपला पराभव स्वीकारला. मी हा पराभव स्वीकारते, पुढे या पराभवाची समीक्षा आपण करु असं म्हणत मताधिक्य मिळालेल्यांनाही विजय अनाकलनीय आहे ही बाब पंकजा यांनी अधोरेखित केली. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या मात्र या सगळ्यात पंकजा मुंडे कुठेच नव्हत्या. अखेर आज फेसबुक पोस्ट लिहून पंकजा मुंडे यांनी आपण काही काळाकरता अलिप्त राहणार असल्याचं म्हटलं आहे.