मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वाभिमानी दिनाची हाक दिलीय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर जमण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे कालच्या औरंगाबादच्या बैठकीपाठोपाठ आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही दांडी मारण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडेंनी यापूर्वी गोपीनाथ गडावरील १२ डिसेंबरच्या मेळाव्याबाबत फेसबुक पोस्ट टाकून नाराज असल्याचा संदेश दिला. मात्र त्याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र दुसऱ्या बाजुला त्या नाराज असल्याचं वारंवार दाखवत राहिल्या. त्याचाच भाग म्हणजे भाजपच्या औरंगाबादच्या बैठकीला त्यांनी प्रकृतीचं कारण देत दांडी मारली. मात्र पक्षाने त्याची विशेष दखल घेतली नाही.


विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडेंना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळेच १२ डिसेंबरच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसऱ्या पक्षात त्या जाणार नसल्या तरी आपल्या पक्षात तरी वजन कायम राहावं यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच की काय पक्षानं त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. 


आज मुंबईला भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक आहे, पंकजा मुंडे या कोअर कमिटीच्या सदस्य आहेत. मात्र कोअर कमिटीच्या बैठकीला येणार नसल्याचं पक्षाने गृहीत धरल्याचे दिसत आहे. त्याआधीही झालेल्या बैठकीला पंकजा या गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला अद्याप यश आलेले नाही. विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची तातडीने भेट घेतली होती. त्यांच्याशी चर्चाही केली. त्यानंत तावडे यांनी पंकजा या पक्षातच असल्याचे म्हटले होते. पंकजा यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.