मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. यामुळे शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आता पालक वर्गातूनच शाळा सुरू करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.


शिक्षण विभागचं सर्वेक्षण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात 85% पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. कोरोनामुक्त भागात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. आता अन्य वर्ग सुरू करण्याची मागणी केली जात आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात जवळपास 85% पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचं समोर आलं आहे.


ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रतिसाद


ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण भागात सुविधा नसताना सर्वेक्षणातील सर्वाधिक प्रतिसाद ग्रामीण भागातून आल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत एकूण 2 लाख 69 हजार 116 नागरिकांनी मत नोंदवलं आहे. यातील सर्वाधिक ग्रामीण भागात राहणाऱ्या 1 लाख 24 हजार 16 पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दिला आहे. तर निमशहरी भागातील 22 हजार 188 पालक आणि शहरातील 78 हजार 246 पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दिला आहे.


कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं मागील संपूर्ण वर्ष वाया गेलं आहे. यामुळे किमान यंदा तरी मुलांचं नुकसान नको असं पालकांना वाटू लागलं आहे. दरम्यान 15 % पालकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे. सर्वेक्षणामध्ये पालकांना 12 जुलै च्या रात्री 12 वाजेपर्यंत आपलं मत नोंदवता येणार आहे. सर्व पालक, शिक्षक शाळा सुरु करण्यासंदर्भात त्यांचा अभिप्राय नोंदवण्यासाठी http://www.maa.ac.in/survey या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.