परखड बाबासाहेब ५ | ``मुंबईचा नफा केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारताकडून वापरला जातो``, पाहा बाबासाहेबांमधील निपुण अर्थशास्त्रज्ञ
विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेली सडेतोड आणि तर्कसंगत उत्तरे यांचा गोषवारा...
मुंबई : भाषावार प्रांतरचना करताना मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये, अशा प्रकारचा युक्तिवाद तत्कालीन विचारवंतांनी (विशेषतः प्रोफेसर सी. एन. वकील, प्रा. दातवाला आणि प्रा. घीवाला यांनी) केला होता. यावर मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे? याचे सर्वात प्रभावी आणि परखड विवेचन केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.
- आक्षेप : 'महाराष्ट्राला मुंबई हवी, कारण मुंबईच्या भांडवली नफ्यावर महाराष्ट्राला गुजराण करावयाची आहे.'
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर खाली वाचा :
"महाराष्ट्रीयनांना मुंबई हवी कारण ते मुंबईच्या नफ्यावर जगू इच्छितात हे म्हणणे चुकीचे तर आहेच, पण खरे म्हणजे हेतूबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आहे. अशा काही हेतूंनी महाराष्ट्रीय प्रेरित आहेत का, हे मला ठाऊक नाही. हा काही व्यापारी समाज नाही... पैसा त्यांचा ईश्वर कधीच नव्हता. हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नव्हे. म्हणूनच तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर समाजांना महाराष्ट्राच्या व्यापार-उदिमाची मक्तेदारी घेण्यासाठी येऊ दिले...
परंतु असा काही हेतू महाराष्ट्रीयांच्या मनात असेल असे जरी गृहित धरले तर त्यांचे काय चुकले ? मुंबईच्या नफ्यावर त्यांचा अधिक हक्क आहे हे स्पष्टच आहे, कारण मुंबईचा व्यापार-उदीम उभा करण्यासाठी अन्य प्रांतातील लोकांपेक्षा मजुरांचा पुरवठा करण्याबाबत त्यांचा सहभाग मोठा आहे व मोठा राहिल...
"दुसरे असे, मुंबईचा नफा केवळ महाराष्ट्राकडून वापरला जात नाही तर संपूर्ण भारताकडून वापरला जातो. इन्कम टॅक्स, सुपरटॅक्स इत्यादी म्हणून जी संपत्ती मुंबई केंद्र सरकारला देते ती केंद्र सरकारकडून संपूर्ण भारतासाठी वापरली जाते आणि सर्व प्रांतांना त्यातील वाटा मिळतो.
मुंबईचा नफा संयुक्त प्रांत, बिहार, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, पूर्व पंजाब आणि मद्रासने गिळंकृत केला तर ते प्रोफेसर वकीलांना चालतो. त्यांची हरकत कशाला तर महाराष्ट्राला त्यातील काही हिस्सा मिळणे याला. हा युक्तिवाद नव्हे. त्यांच्या महाराष्ट्रद्वेषाचे दर्शन आहे...
"मुंबईप्रमाणेच कलकत्ता ही संपूर्ण पूर्व भारताची बाजारपेठ आहे. मुंबईतील महाराष्ट्रीयांप्रमाणेच कलकत्त्यात बंगाली अल्पसंख्याक आहेत. मुंबईतील महाराष्ट्रीयांप्रमाणेच कलकत्त्यातील बंगालीही व्यापार उद्योगाचे मालक नाहीत. कलकत्त्यातील बंगाल्यांची स्थिती तर मुंबईतील महाराष्ट्रीयांपेक्षा डळमळीत आहे.
उदाहरणार्थ महाराष्ट्रीय किमान असा दावा करू शकतात की, त्यांनी मुंबईतील व्यापार-उद्योगांना भांडवल पुरवले नसले तरी कामगार पुरवले आहेत. बंगाली हेही म्हणू शकत नाहीत. मुंबई महाराष्ट्रापासून विलग करण्याचा आग्रही युक्तिवाद जर (राज्य पुनर्रचना) आयोगाने स्वीकारला तर त्याचबरोबर आयोगाला कलकत्ता पश्चिम बंगालपासून वेगळा करावा अशी शिफारसही करावी लागेल.
कारण ज्या कारणासाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकते तेच कारण अस्तित्वात असताना कलकत्ता मात्र पश्चिम बंगालपासून वेगळा का केला जात नाही असा समर्पक प्रश्न विचारला जाऊ शकतो....
"महाराष्ट्र आणि मुंबई केवळ परस्परावलंबीच नाहीत तर अभिन्न आणि अतूट आहेत. त्यांचे विभाजन दोहोंसाठी घातक ठरु शकेल. मुंबईसाठीच्या वीजपाण्याचा स्त्रोत महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा बुद्धिजीवी वर्ग मुंबईत राहतो. महाराष्ट्रातून मुंबई वेगळी काढणे म्हणजे मुंबईचे आर्थिक जीवन डळमळीत करणे होय...."