कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटरच्या आतील स्थानिकांना आता निम्या दरात गाडी पार्क करण्याची सुविधा मिळणार आहे. पालिकेच्या सध्या असलेल्या २७ वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध होईल. वाहनतळांपासून ५०० मीटरच्या आतील अनधिकृत पार्किंग केलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्यानंतर गाडी असलेल्या स्थानिकांची मोठी अडचण झाली होती. कारण वाहनतळात गाडी लावणं म्हणजे दर महिन्याला काही हजारांचा भुर्दंड भरणे सामान्य लोकांना शक्य नव्हते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक रहिवाशांकडूनही गाडी पार्क केल्यास पालिकेकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात असल्यामुळे पालिका आणि स्थानिक यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे स्थानिकांना एक घर, एक गाडी पार्कचे कूपन देऊन अर्ध्या किंमतीत पार्किंग सुविधा देण्याची मागणी करणारे निवेदन शिवसेना नगरसेवक अमेय घोले आणि समाधान सरवणकर यांनी पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना भेटून केले होते.


मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत पालिकेच्या वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत बेकायदा पार्किंग करणार्‍या वाहनचालकांकडून एक ते दहा हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार ७ जुलैपासून सर्व विभागात सुरू केलेल्या कारवाईत दररोज एक ते दोन लाखांचा दंड वसूल केला जात आहे. पालिकेच्या वाहनतळांवर स्थानिकांना सध्याच्या निर्धारित दरांपेक्षा अर्ध्या दरात पार्किंग सुविधा उपलब्ध होईल. तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली.