मुंबईकरांच्या पार्किंगचे पैसे कुणाच्या घशात जातायत?
उड्डाणपुलाखालची जागा `नो पार्किंग घोषित करून दोन दिवस उलटले तरीही पार्किंग सुरूच आहेत. महापालिका, पोलीस कारवाईसाठी नेमकी कोणाची वाट पाहात आहेत हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय.
मुंबई : उड्डाणपुलाखालची जागा 'नो पार्किंग घोषित करून दोन दिवस उलटले तरीही पार्किंग सुरूच आहेत. महापालिका, पोलीस कारवाईसाठी नेमकी कोणाची वाट पाहात आहेत हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय.
मुंबईतील उड्डाणपुलांखालील जागांना नो पार्कींग झोन घोषित केलं असून वाहतूक पोलीस, मुंबई मनपा यांनी या अनधिकृत पार्कींगवर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
दादर परिसरात, कुर्ला पूर्व इथल्या संत रविदास उड्डाणपुलाखाली यांसहीत अनेक ठिकाणी खुलेआम पार्किंग होत आहे. त्याबद्दल शुल्कही आकारलं जातंय.
एका दुचाकीसाठी दिवसाला ३० रूपये, महिन्याला ४०० रूपये तर चारचाकीसाठी दिवसाला ५० रूपये तर महिन्याला ४०० रूपये आकारले जात आहेत. एमएसआरडीसीचा फलक लावून शुल्क घेतलं जातंय. धक्कादायक म्हणजे, जी पावती देण्यात येते त्यावर मात्र कोणत्याही प्रकारचं नाव अथवा पत्ता लिहिलेला नाही. त्यामुळे नेमकं या पार्कींगचं भाडं कोण वसूल करतय? हे स्पष्ट होत नाहीय.
पार्किंग संदर्भातले करार आधीच रद्द करण्यात आलेत. अनधिकृत पार्किंग रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असं स्पष्टीकरण एमएसआरडीसीनं दिलंय.