मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती
परमबीर सिंह नवे पोलीस आयुक्त
मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची घोषणा करण्यात आली आहे. आज संजय बर्वे निवृत्त झाले त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर परम वीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. परम बीर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. आता ते मानाच्या मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेत आहेत. परम बीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे हे महत्त्वाचं पद पोलीस महासंचालक दर्जाचंच ठेवण्यात आल्याचं स्पष्ट आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवा निवृत्त झाले. संजय बर्वे यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते? मुंबईचे पोलीस आयुक्तपद कोणाला मिळणार? याची मोठी उत्सुकता होती. अखेर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांचं नाव आघाडीवर होतं.
संजय बर्वे शनिवारी सेवा निवृत्त झाले. मुंबई पोलीस पथकाकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नायगाव मैदानात त्यांचा शानदार निरोप समारंभ पार पडला. बर्वे यांच्या कार्यकाळानंतर त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही असं राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केलं होतं.
मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांच्यासह, अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकदेशम यांचीही नावं चर्चेत होती. अखेर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.